

Air Chief Marshal Ashutosh Dixit : परकीय हेरगिरी करणारी जाळी आता केवळ पारंपरिक 'हनी ट्रॅप'पुरती मर्यादित राहिलेली नाहीत; त्याऐवजी ती सायबर-हेरगिरी, मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजना आणि कर्ज देऊन जाळ्यात ओढणे (प्रिडेटरी लेंडिंग) यांसारख्या मार्गांचा वापर करत आहेत. याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर आणि त्यांच्या संशोधन नेटवर्कने अत्यंत भक्कम तांत्रिक व संस्थात्मक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत, असे स्पष्ट करत एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी परकीय गुप्तचर संस्थांकडून वापरल्या जाणाऱ्या हेरगिरीच्या नवीन पद्धतींवर प्रकाश टाकला.
'एएनआय नॅशनल सिक्युरिटी समिट ३.०' मध्ये बोलताना एअर चीफ मार्शल दीक्षित म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तींना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवणे, हा एका मोठ्या गुप्तचर आव्हानाचा केवळ एक छोटासा भाग आहे. ही हेरगिरी करणारी जाळी प्रामुख्याने सरकारी प्रयोगशाळांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील संरक्षण कंत्राटदारांकडे कार्यरत असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करतात.
"हा केवळ हनी ट्रॅपचा विषय नाही, तर ती थेट सायबर हेरगिरी आहे. आजकाल सायबर माध्यमांतून आणि वेगवेगळ्या प्रलोभनांद्वारे माहिती काढून घेतली जाते. हनी ट्रॅप हा या मोठ्या चित्राचा केवळ एक पैलू आहे. याशिवाय मल्टि-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) आणि बेकायदेशीर सावकारी करणारे घटकही सक्रिय आहेत. आम्हाला याची पूर्ण कल्पना असून त्यावर आमची करडी नजर आहे. हे रोखण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत," असेही आशुतोष दीक्षित यांनी स्पष्ट केले.
परदेशी गुप्तचर यंत्रणा आता थेट यंत्रणेऐवजी ती हाताळणाऱ्या माणसांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत, याकडे वायुसेना प्रमुखांनी लक्ष वेधले. आपल्या नेटवर्कमध्ये बाहेरून शिरकाव करणे अशक्य असल्याने आतील व्यक्तींनाच फितवून धोका निर्माण केला जात आहे. मात्र, आम्ही याबाबत सतर्क असून त्यावर तांत्रिक आणि संस्थात्मक स्तरावर उपाययोजना राबवल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत बोलताना योग्य सॉफ्टवेअरचा वापर आणि जनजागृती महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. खासगी कंपन्यांनी नेटवर्क कसे वापरावे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून, त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण बहुतांश वेळा सुरक्षित राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती चोरल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांत अनेक हाय-प्रोफाइल कारवाया करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'शी संबंधित हस्तकांनी सोशल मीडियावर बनावट खाती उघडून आणि पैशांचे आमिष दाखवून माहिती मिळवल्याचे तपासात समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांनी नुकतीच एका संरक्षण अधिकाऱ्याला संवेदनशील माहिती लीक केल्याप्रकरणी अटक केली. या अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्याच्या मोबाईलमध्ये डेटा चोरणारे मालवेअर टाकण्याचाही प्रयत्न केला होता. वैयक्तिक आयुष्यात कठीण काळातून जाणाऱ्या या अधिकाऱ्याशी एका महिलेने सोशल मीडियावर मैत्री केली होती. ती पाकिस्तानी हस्तकांसाठी काम करत असल्याचा संशय आहे. ऑक्टोबरमध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी विशाखापट्टणम येथून नौदलाचा ३१ वर्षीय खलाशी प्रदीप मुखर्जी आणि एका कंत्राटी चालकाला अटक केली होती. एका पाकिस्तानी महिला हस्तकाने ऑनलाइन माध्यमातून मुखर्जीला अनेक महिने आपल्या जाळ्यात अडकवले होते.